हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात गारपिटीसह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली. तर मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली.
२० व २१ तारखेला जालना औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अन्य भागात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला होता. भोकरदन तालुक्यातील पारध व रेणुकाई पिंपळगाव येथे काल रात्रीच्या सुमारास गार पडल्या यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. गारपिटीमुळे, गहू, हरभरा, व मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. २१ व २२ तारखेला देखील ढगाळ वातावरण राहून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.